बंद

    फरकांडे, एरंडोल येथील झुलते मनोरे

    स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले फरकांडे येथील झुलते मनोरे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. तीन घुमटांच्या मशिदीचे पुढील दोन मिनार म्हणजेच झुलते मनोरे. मात्र, सध्या ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

    जळगाव- धुळे महामार्गावर जवळपास ३० किलोमीटरवरील एरंडोल हे तालुक्याचे ठिकाण. येथून जवळपास १२ किलोमीटरवर कासोदा आणि तीन किलोमीटरवर फरकांडे गाव आहे.
    स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले फरकांडे येथील झुलते मनोरे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. तीन घुमटांच्या मशिदीचे पुढील दोन मिनार म्हणजेच झुलते मनोरे. मात्र, सध्या ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, फरकांडे येथे पोहोचल्यावर गावातूनच एक मार्ग या प्रार्थनास्थळापर्यंत जातो. यातील एक मनोरा २१ मार्च १९९१ रोजी कोसळल्याने फक्त एकच मनोरा राहिला आहे. तोही शेवटच्या घटका मोजत आहे. मनोऱ्यांची उंची १५ मीटर आहे. आतील बाजूस १५ मीटर लांबीची महिरपींची एक भिंत आहे. मनोऱ्यावर जाण्यासाठी मनोऱ्याच्याच आतील बाजूस गोलाकार पायऱ्या आहेत. अतिशय रुंद असलेल्या या मनोऱ्यातून एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो. मनोऱ्यावर चढताना काही ठिकाणी प्रकाश व हवा येण्यासाठी जागा (खिडकी) सोडण्यात आली आहे. त्यामुळे अतिशय रुंद असलेल्या या मार्गातून जाताना श्वास कोंडला जात नाही. वर टोकावर पोहोचल्यावर चारही बाजूने लहान कमानी आहेत. त्यामुळे टोकावर बसून तुम्ही संपूर्ण गावाचा परिसर पाहू शकतात. त्याचप्रमाणे या मनोऱ्यावर बसून मनोरा हलविल्यास दुसरा मनोरा आपोआप हलायचा, तर पूर्वी दोन्ही मनोऱ्यातील भिंतदेखील हलत होती, असे म्हटले जाते. त्यामुळे या वास्तूला झुलते मनोरे अर्थात ‘स्विगिंग टॉवर्स ऑफ फरकांडे’ म्हणून संबोधले जाते. आता यातील एक मनोरा पूर्णपणे ढासळला असून, त्याचा ढीग बाजूलाच पडलेला आहे. चारशे वर्षांपूर्वीचे बांधकाम काहींच्या मते, ही मशीद ४०० वर्षांपूर्वी फारुकी राजवटीत बांधली गेली असावी व फारूकी घराण्यावरूनच या गावास फरकांडे हे नाव पडले असावे. येथे हत्तींचा व्यापारदेखील प्रसिद्ध होता, असे म्हटले जाते.

    तंत्रशुद्ध पद्धतीने बनविण्यात आलेली ही वास्तू वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. फरकांडे हे गाव भुईकोट किल्ल्यात वसले आहे. परिसरात आजही काही ठिकाणी किल्ल्याचे अवशेष आणि गावाच्या भोवती तटबंदीचे भग्नावशेष दिसतात. झुलते मनोरे असलेल्या मशिदीच्या वास्तूत प्रवेश करताच डाव्या बाजूस पाण्याचा हौद बांधण्यात आला आहे. तो आजही सुस्थितीत आहे. मशिदीच्या मागे असलेल्या विहिरीतून या हौदात पाणी आणण्यासाठी विटांचा नाला बांधण्यात आला होता; परंतु तो आता मध्यमागी तुटल्यामुळे हौदात पाणी येत नाही. हत्तींसाठी या हौदाचे बांधकाम करण्यात आल्याचे म्हटले जाते. ऊतावळी नदी बऱ्हाणपूरपासून येथे वहात येते.

    संपर्क तपशील

    पत्ता: जळगाव

    फराकंडे, एरंडोलचे झुलते मिनार