बंद

    श्री मनुदेवी तीर्थक्षेत्र – जळगाव

    महाराष्ट्रात वैभवशाली, संपन्न सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडिचा जिल्हा म्हणजे जळगांव जिल्हा होय. जळगांव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा हा पर्वत असून सूर्यकन्या तापी नदीचा हा भूसंपन्न परिसर आहे. यावल ते अंकलेश्वर महामार्गावर, चोपडा ते यावल राज्य रस्त्याच्या चिंचोली किंनगावच्या पश्चिम दिशेला उत्तरेस आंडगाव फाटा आहे. या आंडगाव फाट्यापासून श्री मनुदेवी तीर्थक्षेत्र अवघे 9 किलोमीटरवर आहे.

    या आंडगाव फाट्यापासून श्री मनुदेवी तीर्थक्षेत्राकडे जातांना 6 किलोमीटरवर श्री हनुमानाचे मंदिर आहे. श्री हनुमान मंदिरापर्यंतची सडक ही पक्की डांबराची आहे. मंदिराजवळ सुंदर पाझर तलाव आहे. मंदिरापासून श्री मनुदेवी तीर्थक्षेत्र जवळपास ३ किलोमीटरवर आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा 3 किलोमीटरचा कच्चा रस्ता संस्थेने बांधून घेतला आहे. त्यामुळे आता खाजगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात. जळगांव ते मंदिर हे 35 कि.मी. आहे.

    मंदिराचा इतिहास

    श्री मनुदेवी क्षेत्राजवळ गेल्यावर सुरुवातीला भाविकांच्या स्वागताला उंच उंच वृक्ष उभे आहेत. श्री परशुराम उभा आहे. मंदिर हे अतिप्राचीन आहे. अवशेषांवरून, उत्खननातून सापडलेल्या मूर्तीवरून त्याची प्राचीनता स्पष्ट होते. या तीर्थक्षेत्राचा शोध इ.स. 1251 मध्ये इंगळे घराण्याचे पूर्वज कै. पांडू जीवन इंगळे यांनी घेतल्याचे सांगितले जाते.

    या मंदिरापासून सातपुडा पर्वतामध्ये 4 ते 5 कि.मी. अंतरावर गवळी वाड्यांचे अवशेष दिसतात. ईश्वसेन राजा या भागात राज्य करीत असताना त्याने या हेमाडपंथी मंदिराची बांधणी केली होती. मंदिराभोवती 13 फूट उंच आणि 2 कि.मी. लांबीच्या भिंती आहेत. बुरुजांचे काही भाग ढासळलेले असले तरीही त्यावरून मजबुतीची कल्पना येते.

    मंदिर परिसरात 7-8 विहिरी आढळतात. सभामंडप 86 X 50 फूट, गाभारा 22 X 14 फूट इतका भव्य होता.

    तीर्थक्षेत्राविषयी दंतकथा

    देवी भागवत पुराणात असा उल्लेख आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांवर मोठे संकट आल्यावर ते सातपुड्याच्या दरीतील गुहेत लपले. तेथे त्यांच्या श्वासातून तेज निर्माण झाले आणि त्या तेजातून श्री मनुदेवी प्रकट झाली. तिने महिषासुराचा वध करण्याचे वचन दिले.

    तीच देवी पुढे श्री सप्तशृंग देवीचे रूप धारण करून महिषासुराचा वध करायला गेली. शिरागड, नांद्रा, पाटणा आणि सप्तशृंग पर्वत या ठिकाणी युद्ध करून तिने विजय मिळवला. त्यामुळे मनुदेवीचे अनेक स्वरूपे विविध ठिकाणी प्रसिद्ध आहेत.

    श्री मनुदेवी: एक शक्तीपीठ

    तिच्या भक्तांना पुत्र, स्त्री, धन, मनोकामना यशस्वी करणारी ही देवी आहे. दुर्गा, चंडिका, अंबिका, शारदा, भद्रकाली इत्यादी नावांनी ही देवी जगभर प्रसिद्ध आहे. पण मनाच्या इच्छा पूर्ण करणारी, मनःशक्तीपीठ म्हणजेच श्री मनुदेवी सातपुड्यात वास करते.

    मंदिराचा निसर्गरम्य परिसर

    मंदिराच्या तिन्ही बाजूंनी उंच कडे आहेत आणि समोर अंदाजे 400 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे. वर्षातील 6-7 महिने तो वाहतो. पाझर तलाव आणि हनुमान मंदिर परिसर रमणीय व निसर्गरम्य आहे. भाविकांबरोबर पर्यटक व शालेय विद्यार्थ्यांचीही येथे गर्दी असते.

    या तीर्थक्षेत्राचा पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा, अशी भावना भाविक व विश्वस्त मंडळ महाराष्ट्र शासनाकडे व्यक्त करत आहे.

    श्री मनुदेवी बससेवा आणि मार्ग

    • जळगावहून मनुदेवी फाट्यापर्यंत जाणाऱ्या बसेसचे वेळापत्रक:
      • 08:15 AM
      • 11:15 AM
      • 03:30 PM
    • परतीच्या बसेस मनुदेवी फाट्याहून जळगावकडे:
      • 09:15 AM
      • 12:15 PM
      • 04:30 PM
    • जळगाव ते श्री मनुदेवी मंदिर अंतर: 35 किलोमीटर
    • चोपडा किंवा यावलहून प्रवास करणाऱ्यांसाठी: किंगगावपर्यंत बस घ्या आणि तेथून मिनीबस सेवा वापरा.

    संपर्क तपशील

    पत्ता: आडगाव, ता. यावल, जि. जळगाव 425302 महाराष्ट्र

    श्री मनुदेवी तीर्थक्षेत्र – जळगाव

    कसे पोहोचाल?

    रस्त्याने

    दररोज जळगांव बसस्थानकावरुन मनुदेवीला दिवसातून ३ वेळा थेट पायथ्यापर्यंत मिनी – बस नुकतीच सुरु करण्यात आली आहे. जळगांवहून तुम्ही खाजगी वाहनाने ( आटोरीक्षा, कार, जीप,टॅक्सी इ. ) थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात.( अंदाजे जाऊन-येऊन 800-1000 रूपये खर्च येऊ शकतो. )