जिल्हा परिषद जळगाव

श्री संत सखाराम महाराज समाधी मंदिर

सखाराम महाराजांची समाधी ही नदीच्या पात्रात असुन. सदर समाधीस २०० वर्ष पुर्ण झाले असुन ती दिमाखात उभी आहे.

खान्देशातील वारकरी संप्रदायाचा ध्वज मोठय़ा डौलाने अमळनेरच्या सखाराम महाराजांच्या खांद्यावर तळपताना दिसतो. सखाराम महाराजांमुळे अमळनेर ही भक्तीपंढरीची पेठ बनली आहे. अमळनेरपासून तीन मैल अंतरावर असलेल्या चिखली नदीच्या काठी पिंपळी गावात मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 1757 साली सखारामचा जन्म झाला. पिता रामभट व माता सीताबाई. बालपणीच मातृ-पितृछत्र हरपले. सावत्र आई नानूबाईसोबत सखाराम चुलतभाऊ रंगनाथकडे रहाण्यास गेले. गंगाबाईंशी विवाहबद्ध झाले. एरंडोलच्या रघुनाथ स्वामी महाराजांनी हाक मारली. त्यांनी अडावद गावी निवास करणा:या श्रीनिवास महाराजांकडे जायची सूचना केली. श्रीनिवास महाराजांनी गुरूपदेश केला.

अमळनेरजवळील अंबर्षी टेकडीवर तपाचरणात सिद्धयोगी महादेव बुवांनीही सखाराम महाराजांना अध्यात्म विद्येत साह्य केले. सखाराम महाराजांच्या वंशवेलीवर पुष्प आले. पण त्यांचे लक्ष श्री विठ्ठलाच्या समचरणी लीन होते. प्रतिवर्षी पंढरपूरला वारीसाठी निघताना स्वहस्ते आपली कुटी जाळण्याचे सखाराम महाराजांचे साहस पाहू जाता संत कबिरांची जो घर जालै आपना चलै हमारे साथही उक्ती आठवते. मुलगा वारला. प}ी निवर्तली. सखाराम आता आशापाशापासून सर्वार्थाने मुक्त झाले. सखाराम महाराजांची शिष्य परंपरा समृद्ध आहे. ते स्वत: मुल्हेर गादीचे शिष्य होते. सखाराम महाराजांनी खानदेशात एक देदीप्यमान वलय उभारले. भक्तीच्या क्षेत्रात अभिनव भावजागरण केले. सखाराम महाराजांचे शिष्योत्तम श्री गोविंद महाराज मालेगावच्या राजेबहादुरांचे अमळनेर येथील खास कारभारी म्हणून काम पहात असत. 1851 साली बाळकृष्ण महाराजांच्या गळ्यात गुरुपदाची माळ घालून गोविंद महाराज ईश्वरचरणी लीन झाले.श्री बाळकृष्ण महाराजांचे मूळ गाव मलकापूर. देशस्थ ऋग्वेदी ब्राrाण शाखेतील खानझोडे, देशपांडे कुटुंबात त्यांचा जन्म झाला. धरणगावच्या सीतारामबुवांनी सुचवल्यावरून आर्थिक घडी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. 1875 साली प्रल्हाद महाराजांजवळ आपला अमूल्य भक्तिवारसा सोपवून बाळकृष्ण महाराजांनी जीवनलीला संपवली.भूमपरांडे गावचे माध्यंदिन शाखेचे शुक्ल यजुव्रेदी ब्राrाण गोपाळ यास सखाराम महाराजांची बहीण बहिणाबाईंची मुलगी भीमा दिली होती. यांचे पुत्र प्रल्हाद महाराज होत. प्रल्हाद महाराजांनी सखाराम महाराजांच्या समाधीजवळ गोविंद महाराजांची समाधी बांधली. बाळकृष्ण महाराजांच्या समाधीच्या बांधकामास आरंभ केला. पंढरपूरला सखाराम महाराज मठ बांधण्यास आरंभ करण्यात आला. पूज्य सखाराम महाराजांच्या समकालीन संत मंडळात अमळनेरचे महादेवसिद्ध आणि लक्ष्मीकांत, सखाराम शिष्योत्तम टिकंभटजी डांगरकर, गोविंदा लोंढारी, धरणगावचे गणेशोपासक योगविद्यासंपन्न कोमटी महाराज, धरणीधर स्वामी, कमळाकर, चोपडय़ाचे गोविंदबुवा, दुसखेडय़ाचे बाळानंद, जळगावचे केशर गिरी, नगरदेवळ्याचे लाडशाखीय किसनजी, शेंदुर्णीचे कडोजी बाबा, जामनेरचे गोविंद महाराज आणि महाराजांचे सुपुत्र तोताराम महाराज अशी नावे येतात. ही संत परंपरा अजूनही यात्रेकरूंची वाट बघत आहे. या संत परंपरेचे वैशिष्टय़ असे की, ही परंपरा जनताभिमुख आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन काठांचे नेमके अनुसंधान जोडून देणारी आहे. यासंदर्भात विठ्ठलभक्ती आणि जीवनातले सार सर्वस्व कळण्याची कळ साधते. साने गुरुजींसारख्या आणि देशाभिमुखता याचा परिचय होतो. खानदेशातून आपल्या वज्र सामथ्र्याने काम करणा:या या संत परंपरेची खूप दीर्घकालीन प्रशस्ती आहे. श्री सखाराम महाराजांची शिष्यपरंपरा 1757 सालापासून सुरू होते.

सखाराम महाराज या नावाने एक प्रसिध्द संत होऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ बोरी नदीच्या पात्रात त्यांची समाधी बांधली आहे. वैशाख महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे व त्यांच्यानंतर चालत आलेल्या परंपरेमुळे अमळनेरला एक क्षेत्र म्हणून त्यावेळी मिळालेली प्रसिध्दी आज कायम असुन ते खानदेशचे प्रतिपंढरपुर समजले जाते. महाराष्ट्रात थोर संत परंपरेचा पाया रचणार्या संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सव म्हणजे सर्वधर्मसमभाव व एकतेचे प्रतीक आहे. या यात्रोत्सवात सर्व जातींचा समावेश असतो. गेल्या २५० वर्षांपासून अखंडपणे सार्जया होणार्या या यात्रोत्सवात एकतेचे दर्शन घडत असते. गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश यात्रोत्सवानिमित्त येणार्या लाखो भाविकांना दिला जातो. यात्रोत्सवातील प्रत्येक सोहळा पार पाडणे ही एक कसोटी असते. मात्र येथील सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात. वर्षानुवर्षे परंपरेप्रमाणे प्रत्येक समाजातील व्यक्ती आपापली जबाबदारी खांद्यावर घेतो. त्यामुळे हा यात्रोत्सव लिलया पार पाडला जातो, हे या यात्रोत्सवाचे वैशिष्ट्य आहे ” प्रतिपंढरपूर ” च्या नदीपात्रातील समाधी मंदिरे बोरी नदीपात्रात मूळ गादी पुरुष संत सखाराम महाराज, बाळकृष्ण महाराज व प्रल्हाद महाराज यांच्या समाधींचे बांधकाम झालेले आहे. ही समाधी दुरून एकसारखी दिसत असली तरी त्यांच्या बांधकामाची शैली वैविध्यपूर्ण आहे. मूळ गादी पुरुष संत सखाराम महाराजांनी वैशाख शुद्ध १४ म्हणजे १८१८ मध्ये समाधी घेतली. त्यांनी समाधी घेतल्यानंतर काही महिन्यांनी नदीपात्रात समाधीचे बांधकाम सुरू झाले. या समाधीचे बांधकाम दगड, चुनखडीत झाले. हे काम करण्यासाठी दहा वर्षे लागली. समाधीचे बांधकाम तुळजापुरी पद्धतीचे आहे. समाधी मंदिराच्या वर पूर्व दिशेला राम पंचायतन , दक्षिणेला शिव पंचायतन, पश्चिमेला दत्त पंचायतन व उत्तरेला विष्णू पंचायतन आहे. समाधीच्या कमानीच्या दरवाजावर प्रल्हाद आणि नारद यांच्या मूर्ती आहेत. संत सखाराम महाराजांच्या समाधी शेजारीच बाळकृष्ण महाराजांची समाधी आहे. बाळकृष्ण महाराजांनी १८७६ मध्ये समाधी घेतल्यानंतर समाधीच्या बांधकामाला सुरुवात झाली. या समाधीचे बांधकामही दगड, चुनखडीत आहे. समाधीची रचना कमळाकार व श्री यंत्राच्या पद्धतीची आहे. संत सखाराम महाराज गादी परंपरेतील प्रल्हाद महाराज हे चौथे गादी पुरुष. त्यांनी समाधी घेतल्यानंतर भक्तांतर्फे त्यांचीही समाधी नदीपात्रात बांधण्यात आली. या समाधीचे बांधकाम राजस्थानी पद्धतीचे आहे.

दोन समाधी मंदिरे पंढरपुरात : संत सखाराम महाराज परंपरेतील गोविंद महाराज व तुकाराम महाराज यांची समाधी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात बांधण्यात आलेली आहे. प्रत्येकावर जबाबदारी – हा सोहळा पार पाडण्यासाठी शहरातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अक्षय्यतृतीयेला स्तंभ व ध्वजारोहण आणि सभामंडप उभारण्यासाठी लाकडी खांबाची आवश्यकता असते. ते वाडीतून वाहून आणून, बोरीच्या वाळवंटातील संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर आणून टाकण्याची जबाबदारी महाजन-माळी समाजावर आहे. हे साहित्य आणल्यावर मांडव उभारण्याचे काम पाटील समाजाकडे आहे. मांडव उभारल्यावर त्यावर गोणपाट टाकण्याचे काम वाणी समाजाकडे, तर कनात लावण्याचे काम शिंपी समाजाकडे आहे. रथ सजावट – रथ सजावटीचे काम धनगर बांधव, तसेच भालदार-चोपदार करीत असतात. रथावर देव ठेवण्याची जबाबदारी देव घराण्याकडे आहे. रथावर दक्षिणा घेण्याची जबाबदारी ब्राह्मण बंगाली समाजाकडे आहे, तर देव पूजनाची जबाबदारी देव घराण्याकडे आहे. बेलदार समाजाकडेही जबाबदारी रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लीम समाजाला दिला जातो. त्यानंतर शहरातून मार्गस्थ होत असलेल्या रथाला ठिकठिकाणी दिशा देण्याचे काम धनगर समाज बांधव करीत असतात. वाटेतच रथाला आक लागला, रस्त्यात रथाचे चाक अडकले तर ते घणाद्वारे यशस्वीपणे काढण्याची जबाबदारी बेलदार समाज पार पाडतो. रथोत्सवाचा मार्ग मशालीद्वारे प्रकाशमान करण्याची जबाबदारी न्हावी बांधवांची असते. लहान रथाची सेवा भोई समाजाकडे आहे. अशा रीतीने सर्व जातीधर्माचा सहभाग असलेला हा सोहळा मोठय़ा हर्षोल्हासात पार पाडला जातो. प्रत्येक समाजाचा सहभाग असल्याने सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकोपा वृद्धिंगत होत असतो. महाराष्ट्रातील शेवटचा यात्रोत्सव अमळनेरात साजरा होत असतो. यात बारा बुलतेदारांचा सक्रिय सहभाग असतो. या उत्सवाला २५० वर्षांची परंपरा आहे. हा उत्सव सर्वसमावेशक असल्याने दरवर्षी मोठय़ा उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. यंदा बोरी नदीच्या उत्सवाची पूर्वतयारी झालेली आहे. नदीपात्रात विविध पाळणे, खेळण्यांची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली जात आहेत. यात्रोत्सवाच्या काळात डोळ्यांचे शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. शहरातील सर्व डॉक्टर मोफत सेवा देतात. औषधीही मोफत देत असतात, पांडुरंग देवाच्या स्थापनेचा वर्धापन दिन आणि संत सखाराम महाराजांची पुण्यतिथी यांचा संयोग साधून वैशाख शुद्ध एकादशी ते पौर्णिमेदरम्यान सर्व जातीधर्म समावेशक रथोत्सव व पालखी मिरवणूक काढली जाते. सर्व धर्म मिळून रथोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करतात. वाडीची रचना पंढरपुरासारखीच मूळ मंदिर १८१५ मध्ये बांधले.. संत सखाराम महाराजांच्या वाडीची रचना ही पंढरपुरातील विठ्ठल-रूख्मिणी मंदिरासारखीच आहे. म्हणून हे प्रति पंढरपूर म्हटले जाते. तर विठ्ठल मंदिरात पंचायतन असून, ते खान्देशात क्वचितच ठिकाणी पाहावयास मिळते. त्यामुळे वाडी संस्थानातील विठ्ठल मंदिराला विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी १८०६ मध्ये मूळ सखाराम महाराजांनी आपले गुरू लक्ष्मीकांत महाराज यांची समाधी बांधली आहे. तर १८१५ मध्ये विठ्ठल-रूख्मिणीचे छोटे मंदिर बांधण्यात आले. ते आजही त्याच स्वरूपाच आहे.

मंदिरात पंचायतन : या मंदिरात पंचायतन आहे. विठ्ठलाच्या उजव्या हाताला राधिका माता, डाव्या हाताला रूख्मिणी माता आहे. राधिका मातेच्या उजव्या बाजूला गरुड, रूख्मिणी मातेच्या बाजूला हनुमान आहे. खान्देशापासून पंढरपूर दूर आहे. पांडुरंगाने पंढरपूरचा आनंद वैशाखात खान्देशातील भाविकांना द्यावा म्हणून, संत सखाराम महाराजांनी पंचायतनची स्थापना केलेली आहे. वाडी संस्थानच्या बांधकामाचा लाकडी टप्पा हा आनंदराव देशमुख व रावबहादूर मालेगावकर यांनी केले आहे.वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणीही १६ खांब आहेत. हे खांब विष्णूच्या सेवकांचे प्रतीक मानले जातात. मंदिराच्या वरच्या बाजूस दशावतार कोरलेले असून, ते वासुदेव महाराजांच्या कार्यकाळात कोरण्यात आलेले आहेत.

दोन्ही वाऱ्या वाऱ्या होतात सार्जया : या संस्थानात शुद्ध एकादशी वारी व वैद्य एकादशी वारी साजरी केली जाते. दोन्ही वाऱ्या राज्यात देहूनंतर अमळनेरातच सार्जया केल्या जात असतात.

मलबार सागापासून बनवला अमळनेरचा रथ : रथाच्या मार्गात आतापर्यंत बदल नाही संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. हा रथ अतिशय उंच असून, तो मलबार सागाच्या लाकडापासून बनविलेला आहे. अमळनेरच्या रथोत्सवाला जवळपास दोनशे वर्षांची परंपरा आहे. वाडी संस्थानचे दुसरे गादी पुरुष गोविंद महाराज यांनी १८१९ मध्ये रथोत्सवाची परंपरा सुरू केली. त्यावेळी पहिला रथ तयार करण्यात आला होता. त्यानंतर वाडी संस्थानचे दुसरे गादी पुरुष बाळकृष्ण महाराज यांनी नवीन रथ तयार केला. हा रथ मलबार सागाच्या लाकडापासून तयार केलेला आहे. दोन चाकांच्या मधील आख अंजनाच्या लाकडापासून बनविलेले आहे. हा रथ बाळकृष्ण महाराजांनी तयार केलेला असल्याने, त्यावर बाळकृष्ण महाराज, गुरुकृष्ण असे लिहिलेले आहे. रथावर श्री गणेश, मारुती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. हा रथ अतिशय उंच असला तरी त्याची नेमकी उंची कोणीही मोजलेली नाही. रथ निघण्याच्या काही दिवस अगोदरच रथाची दुरुस्ती केली जाते. हे काम दरवर्षी होत असते.

रथाला नाड्याने ओढण्याची परंपरा : या रथाला पूर्वीपासूनच नाड्याने ओढण्याची परंपरा आहे. सर्व जातीधर्माचे लोक या उत्सवात सहभागी होत असतात. सायंकाळी निघतो रथ : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देवतांचे रथ निघत असतात. मात्र बहुतांश रथ हे सकाळीच निघत असतात. परंतु अमळनेरातील रथ हा सायंकाळी मुहूर्त बघूनच काढण्यात येत असतो. प्रथम रथ पश्चिम दिशेला वळविला जातो. त्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे हा रथ जात असतो. रथावर श्री लालजींची हातात धनुष्यबाण घेतलेली मूर्ती स्थापन केली जाते. या रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान हा मुस्लीम समाजाकडे परंपरेने आहे. मार्गात बदल नाही : रथोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र त्याच्या मार्गात एकदाही बदल झालेला नाही. वाडी संस्थानातून निघणारा रथ सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशीपूल पैलाडमार्गे वाडीत येतो. पूर्वी पहाटे अडीच-तीन वाजताच रथ वाडीत यायचा. मात्र आता आरत्या वाढल्याने, रथ संस्थानात पोहचण्यास सकाळ उजाडत असते.
गुरू-शिष्याची परंपरा आजही कायम बेलापूरकर महाराज : गुरूकडून होते. स्वागत पांडुरंगाचे नामस्मरण करून, संपूर्ण राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकविण्याचे कार्य ज्या पद्धतीने गुरुवर्य संत सखाराम महाराज व त्यांच्यानंतर गादीवर बसलेल्या संत परुषांद्वारे सुरू आहे, त्याच पद्धतीने त्यांचे शिष्य बेलापूरकर महाराज व त्यांच्या गादीवरील पुरुषांद्वारे ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. ही गुरू-शिष्याची आदर्श परंपरा आजही कायम आहे. त्यात कोणताही बदल आतापर्यंत झालेला नाही. वैशाख वारीसाठी दरवर्षी बेलापूरकर महाराजांचे अमळनेर येथे दशमीला आगमन होत असते. त्यांचे आगमन म्हणजे पंढरीचा पांडुरंग शहरात दाखल झाला, अशी भाविकांची श्रद्धा असते. त्यामुळे बेलापूरकर महाराजांच्या दिंडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेलापूरकर महाराज यांच्या गादीवरील पुरुष मोहन महाराज यांचे नवमीच्या दिवशीच शहरात आगमन होत असते. दुसर्या दिवशी वाडी संस्थानचे गादी पुरुष प्रसाद महाराज शहराच्या वेशीवर जाऊन बेलापूरकर महाराजांचे स्वागत करतात. वारकरी संप्रदायातील ही श्रेष्ठ परंपरा समजली जाते. यात्रोत्सवाच्या काळात बोरी नदीच्या वाळवंटातील संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर ते दररोज टाळ-मृदुंगाच्या गजरात सकाळी नऊ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पहारा (कीर्तन-भजने) देतात. संत सखाराम महाराजांप्रमाणेच शाहू महाराज हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त. वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी दर महिन्याला ते पांडुरंगाची शुद्धवारी करीत असतात. ते नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मूळ रहिवासी. त्यामुळेच ते बेलापूरकर महाराज म्हणून प्रसिद्ध आहे. संत सखाराम महाराज हे त्यांचे गुरू. त्यामुळे त्यांनी पंढरपूर येथे त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. आजही ही गुरू-शिष्याची आगळीवेगळी परंपरा अखंडपणे सुरू आहे. या परंपरेत गुरूकडून शिष्याला मान-सन्मान दिला जातो. बेलापूरकर महाराजांना मान लालजी महाराजांचा रथोत्सव, पालखी मिरवणुकीच्या पुढे दिंडी काढण्याचा मान बेलापूरकर महाराजांना दिला जातो. पौर्णिमेला गुलालाचा पहिला मानही दिला जातो. काल्याचे कीर्तनही बेलापूरकर महाराजांचेच होते. यात्रोत्सवाची सांगता होते. त्यानंतर बेलापूरकर महाराजांची दिंडी रवाना होत असते. १६ तारखेला बेलापुरकर महाराजांचे आगमन व त्यानंतर यात्रेस सुरवात होते

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.